यावल दि.३०
जळगांव जिल्हयातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांचे संपादन व पुनवर्सन करण्यासाठी रु.३०१.३७ कोटीच्या खर्चास शासनाची मान्यता मिळणे बाबत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली.
हत्तपुर प्रकल्प (उर्ध्व तापी टप्पा क्र.१ ) करीता जळगांव जिल्हयातील रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे मुक्ताईनगर ४१३ घरे व रावेर तालुक्यातील मोजे नेहेते ( १२८ घरे ) वाघाडी ( ४६३ घरे ) ऐनपुर ( २५९ घरे ), भामलवाडी ( १९९ घरे ) यांचे संपादन व पुनर्वसन करण्यासाठी अनुक्रमे रु.११० कोटी, रु. २४.९४ कोटी, रु.१००.९३ कोटी, रु.३९.२ कोटी, रु.२६ .४९ कोटी असे एकूण रु.३०१.३७ कोटी च्या खर्चास शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणे बाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळ च्या नियामक मंडळाच्या ६७ वी बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली असून,त्याबाबत तत्काळ कार्यवाही होणेसाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सदरील प्रस्ताव शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणे कामी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या शिफारसीने मंत्रालयात सादर करण्यात आला आहे.हतनूर प्रकल्पामुळे सतत बॅकवॉटरच्या संपर्काने जमिनी हानीकारक झाल्या असून फुगवट्याच्या पाण्यामुळे घरात सत्तत ओल असल्याने व विषारी जिवाणूंचा त्रास होत असल्याने, तसेच पाण्यामुळे जमिनीची झीज होत असल्याने या गावांच्या घरांचे संपादन व पुनर्वसन होणे अत्यंत आवश्यक असल्याबाबत यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी निवेदनात सांगितले आहे.
त्यानुषंगाने सदर प्रस्तावांना जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळ च्या बैठकीत मान्यता प्राप्त झालेली असून, सदर प्रस्ताव शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या मान्यतेस सादर करण्यात आलेला आहे. तरी सदर प्रस्तावास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी त्यांच्या स्तरावरून मंजुरी द्यावी अशी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी विनंती केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा