यावल दि.२८
बाहेरच्या कोणाच्याही देणग्या किंवा मदत न घेता एक गाव आपल्या स्वबळावर प्रयत्न करीत जनतेचा विश्वास संपादन करून संपूर्ण गावाच्या सहकार्यातून सामाजिक काम करीत असताना वेगवेगळ्या संस्थांनी आणि शासनाने पद्मश्री, पद्मभूषण यांसारखे १ कोटी ६७ लक्ष रूपयांचे पुरस्कार दिले. समाजाने दिलेला निधी स्वतःकडे न ठेवता समाजासाठी जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन अशा सामाजिक कार्यकर्त्यांना स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेद्वारे दरवर्षी १५ जून रोजी ‘अण्णा हजारे सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दोन लक्ष रूपये,द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार एक लक्ष पन्नास हजारे रूपये,तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार एक लक्ष रूपये देण्यात येणार आहेत.त्याचप्रमाणे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
अशी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पुरस्कार देणारे गाव राळेगणसिद्धी, ता.पारनेर,
जि.अहिल्यानगर.असे कार्य राळेगणसिद्धी सारख्या गावात होऊ शकते तर इतर गावातही होऊ शकेल अशा आशेने केलेला प्रयत्न आहे हे थोडक्यात माहितीसाठी देत आहे.
लहान वयात घरांमध्ये आईचे संस्कार झाले.आईचे शिक्षण झाले नव्हते.पण पशुपक्ष्यांचा समाज नाही पण माणसाचा समाज आहे. प्रत्येक माणसाने समाजात कसे वागावे याचे ज्ञान आईला चांगल्या प्रकारे असल्याने लहान वयातच आई सांगत असे कोणाची चोरी करू नये,कोणाशी लबाडी करू नये,दुसऱ्या माणसांना त्रास होईल असे वर्तन करू नये,आपले आचार शुद्ध असावे,विचार शुद्ध असावे, जीवन निष्कलंक असावे,वाईट गोष्टीचा कोणताही डाग आपल्या जीवनात असू नये,जर वाईट गोष्टीचा डाग आपल्या जीवनात लागला तर तो डाग माणसाला बैचेन करीत असतो रात्री झोप येत नाही म्हणून त्यांना झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावे लागते.त्याचप्रमाणे अशा माणसाच्या शब्दांनाही किंमत राहत नाही.हे लहान वयात माझ्या जीवनात झालेले आईचे संस्कार, शाळेत झालेले संस्कार,स्वामी विवेकानंदाच्या पुस्तका द्वारे झालेले संस्कार, महात्मा गांधीजींच्या विचाराचा जीवनावर झालेला प्रभाव त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.जीवनात फक्त सेवा मानवसेवा हीच माधव सेवा समजून सेवा करण्याचा निर्णय घेतला.कारण लग्न करावं तर चूल पेटवण्यात जीवनाचा वेळ जाईल मग सामाजिक बांधिलकीची जाणीव कमी होईल आणि गाव, समाज,देशाची सेवा करण्यासाठी वेळ मिळणार नाही.कारण घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे आपणाला गाव,समाज आणि देशाची निष्काम भावनेने सेवा करायची ते करता येणार नाही म्हणून लग्न करायचे नाही हा निर्णय घेतला.आणि गाव समाज आणि देशाची सेवा करण्याचा निर्णय झाला.सुरुवातीला जगण्यासाठी काहीतरी आधार असावा आणि देश सेवा घडावी म्हणून सैन्यात जाण्याचे ठरविले. सैन्यात गेल्यामुळे संपूर्ण हिमालयात जाण्याचा योग आला. सैन्यातील आलेले अनुभव मला फार मोलाचे ठरले सैन्यात असताना सात ते आठ वर्ष हिमालयातील बर्फात राहण्याचा योग आला.ज्यांनी मला जन्म दिला त्या आई वडीलांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे म्हणून त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मला मिळणाऱ्या मानधन / पगारामधून त्यांना पैसे पाठवीत गेलो.पेन्शनचा हकदार झालो.पंधरा वर्षे सेवा केल्यानंतर मी सैन्यातून स्व-खुशीने निवृत्त झालो. पेन्शनमुळे मला जगण्याचा आधार आल्यामुळे मला पूर्णवेळ गाव, समाज आणि देशाची सेवा करता आली.निष्काम भावनेने केलेली सेवा हीच ईश्वराची पूजा आहे असं समजून सेवा करीत राहिलो. कोणत्याही फळाची अपेक्षा केली नाही.आजही नव्वद वर्षाच्या वयात फक्त झोपण्याचे बिस्तर आणि जेवणाचे ताट या व्यतिरिक्त जीवनात काहीही ठेवले नाही. हळूहळू सेवेचे कार्य होत गेले आणि महाराष्ट्रातील गावगांवचे लोक झालेले कार्य पाहण्यासाठी गावाला भेट देऊ लागले.त्यामुळे संतांनी म्हटल्या प्रमाणे सज्जनाचे कार्य चाले,वाऱ्या हाती। ते कार्य पसरत गेले आणि त्यामुळे कोणाकडूनही देणग्या न घेता कार्य उभे होत गेल्यामुळे देशाच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री,पद्मभूषण पुरस्कार दिले. मात्र पत्रावर कधी पद्मश्री, पद्मभूषण असे लिहले नाही.विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांकडून या कामासाठी पुरस्कार मिळणे सुरू झाले आणि सन १९८६ सालापासून ते २०१९ पर्यंत एकूण पुरस्काराची रक्कम १ कोटी ६७ लाख इतकी जमा झाली. पुरस्काराचे पैसे मी इतर कुठेही खर्च केलेले नाही.पेन्शन मिळत असल्यामळे गरज पडली नाही.सन १९८६ सालापासून ते २०१९ पर्यंत १ कोटी ६७ लाख रुपयाचा निधी जमा झाला त्याचे व्याज मिळू लागले ते व्याजाचे पैसे सुद्धा जनसेवेसाठी खर्च करता आले. दरवर्षी किमान दहा लक्ष रूपये व्याजाची रक्कम येऊ लागली.आयुष्यात
जनसेवेचे व्रत घेऊन जनतेची सेवा करीत आलो.ती सेवा मी हयात असेपर्यंत चालत राहावी आणि मी गेल्यानंतरही ती सेवा चालत राहावी म्हणून राज्यात आणि देशात ज्या कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले अशा कार्यकर्त्यांचा शोध घेऊन ज्यांचे आचार शुद्ध आहे, विचार शुद्ध आहे जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे आणि ते सत्याच्या मार्गाने चालत आहेत अशा कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. मला मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमेचा ट्रस्ट करण्यात आला.त्या निधीच्या व्याजाच्या आधाराने सर्व साधारण दहा लाख रूपये इतकी रक्कम जमा होत असून माझ्या नंतरही सेवा अविरतपणे चालू राहावी जेणेकरून समाजसेवच्या कार्यात खंड पडू नये अशी तरतूद करण्यात आली आहे.
या निधीला ‘स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. माझ्या आयुष्यात मी माझ्यासाठी किंवा परिवारासाठी कोणताही ट्रस्ट केला नाही.मात्र दुःखी-पिडीत, रंजल्या गांजल्यांना आधार मिळावा अशा हेतूने हा ट्रस्ट स्थापन केला असून अव्याहतपणे सेवा घडावी हिच इच्छा.प्रत्येक वर्षी स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी प्रथम क्रमांचा पुरस्कार दोन लक्ष रूपये, द्वितीय क्रमांचा पुरस्कार एक लक्ष पन्नास हजार रूपये,तृतीय क्रमांकाचा पुरस्कार एक लक्ष रूपये,आणि चतुर्थ क्रमांचा पुरस्कार एक लक्ष रूपये असे पुरस्कार स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.आमच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो लोकांनी प्राणाचे बलिदान केले. अनंत हाल अपेष्टा भोगल्या आणि आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.त्यांना अभिवादन करण्यासाठी २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्रत्येक वर्षी माझ्या जन्मदिनी १५ जून रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामागे स्वार्थ नाही. फक्त सेवाभाव वाढीला लागावा एवढीच अपेक्षा.आयुष्याची नव्वद वर्ष जे परिश्रम केले त्या परिश्रमाचे सार्थक झाले.त्यासाठी दरवर्षी पुरस्कार वितरणच्या दिवशी संपूर्ण गावाला भोजन देण्याचे ठरविले. समाजाने दिले ते समाजाला अर्पण करण्याचा मुख्य उद्देश. त्यामुळे जीवनात अखंड आनंद मिळतो. दुःख राहिलेच नाही कारण मी संपला, माझे संपले.आणि माझे संपले की सर्वत्र आनंद आहे.त्या आनंदात मग्न असतो.
कि. बा. तथा अण्णा हजारे.
राळेगणसिद्धी.
टिप्पणी पोस्ट करा