प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे यांचा उद्या बुधवार दि. ४ रोजी यावल येथील पदमावती लॉन्स धनश्री टॉकीज मध्ये एकसष्टीपूर्ती सोहळा.


यावल दि.३
*व्यावसायिकता व सामाजिकता यांचा सुरेल संगम असलेले प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे* 
 
*देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डो रीहळे*
*मंगलाने गंध DCलेले, सुंदराचे सोहळे*
*देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती*
*वाळवंटातूनसुद्धा , स्वस्तिपद्मे रेखिती*

     या ओळींची सार्थकता ज्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा चढता आलेख पहिला की नक्की पटते. ज्यांनी या जीवनरुपी मातीमध्ये कष्टाचे बीज रोवले,जिद्दीचे जलसिंचन केले,नीतिमत्तेचे खतपाणी घातले आणि लौकिकार्थाने वाळवंटात यशाची बाग फुलविली हे श्रद्धावान व्यक्तिमत्व म्हणजे यावलचे प्रगतशील शेतकरी प्रमोद यशवंत नेमाडे. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६३ रोजी यावल येथे झाला.   
       वडील यशवंत श्यामजी नेमाडे व आई सौ. सुशिलाबाई या संस्कृती व संस्कार संपन्न माता-पिताच्या पोटी जन्म घेण्याचे भाग्य आपणास लाभले.त्यांचे वडील नामांकित शेतकरी होते तर आई गृहिणी. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये वडिलांनी शेतीचे तर आईने संस्कार संपन्नतेचे बीज पेरले.त्यांच्या स्नेहिल छत्रछायेतच त्यांचे बालपण व तारुण्य कृतार्थ झाले.परंतु " *ईश्वरी इच्छा बलियेसी'* 'या न्यायाने त्यांच्या वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरवले. वडिलोपार्जित जमीन व संपन्न शेती व्यवसायाचा आणि अलौकिक लोकप्रियतेचा संपन्न वारसा त्यांना प्राप्त झाला. 

     आई-वडिलांचा अविरत कष्टाचा शेती - वारसा पुढे अव्यहातपणे चालू ठेवण्यासाठी आपण बारावी नंतरच्या कॉलेज शिक्षणाला कायमचा रामराम ठोकून ते शेती व्यवसायाकडे वळले.त्यांचे जेष्ठ बंधू पुण्यात नोकरी करीत होते तर दुसरे बंधू कौटुंबिक उत्तरदायित्व सांभाळत होते.त्यामुळे साहजिकच प्रमोद नेमाडे वडिलोपार्जित शेतीच्या व्यवसायाकडे वळले. त्यांचे वडील अनेक वर्ष आपले वडील केळी - ग्रुपचे संचालन उत्साहाने व उमेदीने करीत होते. वडिलांच्या पश्चात हा केळी ग्रुप त्यांनी सांभाळायला सुरुवात केली. १९८२ ते २००५ त्यांचे मामा निळकंठ महाजन यांचेही या कार्यात त्यांना अनमोल सहाय्य लाभले होते. त्यानंतर २००५ पासून हा केळी ग्रुप त्यांनी स्वतःच्या हिमतीवर सांभाळण्यास सुरुवात केली.
      गेली ४२ वर्षे ते या व्यवसायात अविरत कार्यरत असून आपल्या प्रामाणिक आणि तत्पर कार्यशैलीमुळे व सचोटीच्या व्यवहारामुळे जनमानसांत अत्यंत लोकप्रिय व अत्यंत विश्वासार्ह म्हणून नावलौकिक मिळविला आहे .  
      शेतकऱ्यांच्या केळीला त्याच्या प्रतीनुसार योग्य भाव देत असल्याने ते सर्वांच्या मनात घर करून आहेत.त्यांचा केळी ग्रुप शेतकऱ्यांना पंधरा दिवसाच्या आत केळीचे मोबदला ( पैसे ) प्रदान करणारा व विश्वासार्ह सेवाव्रत चालवणारा असा यावल मधील एक मात्र केळी ग्रुप आहे.

  याबरोबरच शेतीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून व शुद्ध नफ्यातून नवनवीन भूमिक्षेत्र संपादन केले.तसेच परिसरातील अन्य लोकांची शेती नफ्याने केल्याने,या पद्धतीचा त्यांना व इतरांना खूपच लाभ झाला.आज आपण जमीन नफ्याने करणारे एक अव्वल यावलवासी म्हणून ते सर्वांच्या हृदयमंदिरी विराजमान झाले आहेत.हे सर्व संपन्न वैभव म्हणजे त्यांच्या अविरत कष्ट सामर्थ्याचे व संपन्न ध्यासाचे प्रतीक आहे.शेती व्यवसायाचा संपन्न वारसा व या व्यवसायाचे बाळकडू आपल्याला आपल्या भूमीप्रेमी माता-पितांकडून लाभल्याने या क्षेत्राबद्दलची तीव्र आकांक्षा व स्वतः प्राप्त केलेली अनुभव संपन्नता या त्रिवेणी संगमात त्यांचे कार्य न्हाऊन निघाले हे कार्य करताना त्यांना पाणी समस्येसाठी खूप संघर्ष करावा लागला.पण हरित विकासाचा ध्यास घेतलेल्या प्रमोद नेमाडे यांनी त्यावर सुद्धा मात करून आपले उद्दिष्ट सफल केले. 

     शेतीत केळी व कापूस ही मुख्य उत्पादने आणि त्याबरोबरच ज्वारी, हरभरा,गहू,मका,ही जोड उत्पादने ते घेत असतात.ते व त्यांचे कनिष्ठ बंधू ,नित्यनियमाने शेतात जातात व आपले नियत दैनंदिन कार्य उत्साहाने पार पाडतात.वेळोवेळी पिकावर फवारणी,शेतीची मशागत करण्यासाठी लहान ट्रॅक्टरचा वापर आधुनिक पद्धतीने शेतीचे नियोजन ते करीत असतात.आजमितीस त्यांच्या शेतामध्ये माणसांचा दैनंदिन राबता आहे.त्यांचे कडे कामगार म्हणून न पाहता त्यांचे ते एक व्यावसायिक कुटुंब आहे.त्या लोकांच्या कुंटुंबाचे अर्थार्जन आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी ते अविरत झटत असतात. 

वडिलांकडून मिळालेला सामाजिक वारसा प्रमोद नेमाडे यांनी जपला आहे.गुरुदत्त केळी ग्रुपचे संस्थापक,संयोजक,आयोजक या नात्याने शेतकरी बंधू आणि गावकऱ्यांचे हित ते जपत आहेत. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा बिगर शेती पुरवठा मर्यादित यावल -संचालक, शशिकांत सखाराम चौधरी कन्या शाळा - उपाध्यक्ष,प्राथमिक शाळा यावल - उपाध्यक्ष,स्वामीनारायण मंदिर यावल संचालक,विठ्ठल मंदिर यावल - अध्यक्ष ,मनूमंदिर यावल - संचालक अशा विविध संस्थांचे माध्यमातून समाजसेवेचे व्रत ते जपत आहे.त्यांच्या प्रगल्भ ज्ञानाचा अनुभव संपन्नतेचा लाभ या संस्थांना सातत्याने होत असतो. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा सुरेख संगम त्यांच्या ठायी आहे.


    यावलचे "स्वामीनारायण मंदिर" व महाजन गल्लीतील "विठ्ठल मंदिर" या दोन्ही वास्तूच्या पवित्र निर्मिती कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.याच्या निर्मिती कार्यात विटा,सिमेंट,स्टील,आदी साधन सामुग्रीचे सहर्ष दान करून त्यांनी धार्मिक मूल्यांचा वारसा जपण्याचे महान कार्य केले आहे.याशिवाय यावल येथील हनुमान मंदिर त्यांनी स्वखर्चाने बांधून त्यात रामभक्त श्री हनुमानाची प्राणप्रतिष्ठा करून ते लोकार्पित केले आहे.तसेच श्री महादेव मंदिराच्या उभारणीसाठी लोकवर्गणी जमा केली आणि कमी पडलेल्या निधीचे स्वतः आयोजन करून ते कार्यही संपन्न केले.यावल स्मशानभूमीत अल्प दरात लाकूड उपलब्ध करून देणे,वजनापेक्षा योग्य त्या प्रमाणात लाकूड उपलब्ध करून देणे,तेथील कामगाराचा पगार देणे,स्मशानभूमीत बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून देणे ही कामे प्रमोद नेमाडे यांनी केली आहेत.एवढेच नाही तर यावल परिसरातील आध्यात्मिक कार्य सदैव कार्यरत राहण्यासाठी ते स्वतः भागवत,व इतर सप्ताह अशा धार्मिक कार्याचे आयोजन करीत असतात. 

      सकाळी शेती व केळी ग्रुपकडे लक्ष पुरविणे केळी ग्रुपचे नियोजन करणे,दुपारी केळीग्रुपचा माल देणे, व माल विकणे,व सायंकाळी धार्मिक कार्यात व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग अशी आपले संपन्न व आदर्श दिनचर्या सर्वांसाठी खास प्रेरक आहे .

     
       त्यांचे कनिष्ठ बंधू रमेशजी हेही आपल्या शेती व्यवसायाचा सन १९८९- ९० पासून मोठे आधारस्तंभ ठरले आहेत त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेती व्यवसायात स्वतःला झोकून दिले आहे.या त्यांच्या श्रमशील वृत्तीमुळे व समर्पित भावनेमुळे आपण आज यावल परिसरात एक अग्रेसर व नामांकित भूमिपुत्र म्हणून प्रख्यात आहेत.  
     
     सौ.मीनाक्षी यांचे बरोबर त्यांचा विवाह सोहळा दि. २ एप्रिल १९८६ रोजी संपन्न झाला.त्यानंतर त्यांच्या पत्नीने व्यवसाय, कुटुंब कबिला यांच्या विकासासाठी आपले पती प्रमोद नेमाडे यांना सावली सारखी साथ दिली आहे.त्यांचे जेष्ठ सुपुत्र स्वप्निल त्यांची पत्नी सौ.मिनल आणि सुकन्या सौ.निकिता या सर्वांचे प्रेमळ सहकार्य आणि सहर्ष पाठिंबा मिळाल्याने आपण आपली ध्यासपूर्ती करू शकलो असे ते आवर्जून सांगतात.ओम, अथर्व,आणि मिहिरा ही नातवंडे आणि आपले जावई चैतन्य या सर्वांसोबत आनंदाने कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहेत.


    प्रमोद नेमाडे यांच्या भव्य -दिव्य कार्याने प्रेरित होऊन अनेक सामाजिक संस्थानी त्यांना सन्मानित करून त्यांचा सार्थ गौरव शतगुणित केला आहे. स्वामीनारायण मंदिर तसेच जैन इरिगेशन जळगाव तर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 


    आज प्रमोद नेमाडे यांची वयाची ६१ वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षात पदार्पण केले आहे.वयाचे वाढते आकडे ही त्यांच्यासाठी केवळ संख्यात्मक घटना आहे.आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. यावलच्या सामजिक व सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झालेले प्रमोद नेमाडे आजही नित्य नियमाने शेतावर जातात,काळी माती आणि हिरवीगार केळी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.त्यांना असलेला शेतीचा लळा आणि ओढ पाहिल्यावर मनामध्ये सुप्रसिद्ध कवी ना.धो.महानोर यांच्या कविता आठवते.मातीशी एकरूप झालेल्या प्रमोद नेमाडे यांच्या मनातील भावनांशी साधर्म्य साधणाऱ्या या ओळी म्हणजे 

*या शेताने लळा लाविला असा असा की*
*सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो*
*आता तर हा जीव अवघा असा जखडला*

*मी त्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो*

- *डॉ योगेश विजय जोशी*

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात