यावल दि.1
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तेसाठी सर्व राजकीय पक्षातील आणि अपक्ष उमेदवारांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत परंतु शेतकरी हितासाठी कोण काय करणार...? याबाबत कोणीही आपल्या तोंडातून शब्द काढायला तयार नाही, यावल तालुक्यात आजही शेतीमालाची खेडा खरेदी सर्रासपणे सुरू आहे, शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री होण्याबाबत भावी संचालक काही ठोस निर्णय घेणार आहेत किंवा नाही..? याबाबत तालुक्यात सर्व स्तरात जोरदार चर्चा सुरू आहे.
भारत हा परंपरेन कृषीप्रधान देश आहे देशाची अर्थव्यवस्था शेतीमालावरील उत्पादनावर अवलंबून आहे, देशातील 70% लोक संख्या ही शेती व्यवसायावर उपजीविका करत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता,आज लोकशाही राज्य असून सुद्धा आपल्या यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतीमाल खरेदी- विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा व्यापारी व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत का ? शेतकरी आपले धान्य नियमितपणे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कमिशन एजंटच्या दुकानात किंवा बाजार समितीच्या आवारात प्रत्यक्षपणे विक्रीसाठी आणत आहे का? बाजार समितीच्या आवारात प्रत्यक्ष विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजन माप होत आहे का? शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात शेतीमालाची खरेदी विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता आणि शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्या माध्यमातून आणि कोणत्या प्रकारे केव्हा उत्तेजित करण्यात आले याबाबत सभापती,संचालकाकडून दक्षता घेतली गेली आहे का?
आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव देण्याची तसेच शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचे 24 तासात पैसे मिळवून देण्याबाबत आणि काही विवादाची विनामूल्य तडजोड करणे बाबतची खात्री बाजार समिती सभापती उपसभापती व संचालकांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना दिली आहे का ?
खेडा खरेदीत शेतीमालाचे वजन व्यापाऱ्यांच्या ठराविक व्यक्तिमार्फत केले जात आहे तसेच यामध्ये धान्य खरेदी करताना फसवणूक घट,तुट व इतर अनिष्ट प्रथा बाजारपेठेत सर्रासपणे सुरू आहे आणि तालुक्यातील शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत आहे.
बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार परवानाधारक यांच्या हिशोबाच्या नोंद वह्या व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी व हिशोब बिल पट्ट्या प्रमाणीत कोणत्या वेळेस व केव्हा केल्या याकडे सभापती उपसभापती व संचालकांनी आतापर्यंत कोणत्या प्रकारे आपले लक्ष केंद्रित केले याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून भावी उमेदवारांनी मतदारांकडून 'मते' मागण्याच्या आधी शेतकरी आणि व्यापारी हितासाठी काय उपक्रम राबविणार आहेत याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाऊन आपले ठोस निर्णय जाहीर करावेत असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा